प्रिय, ज्ञाती बांधव आणि भगिनी व इतर लहानथोर आप्तेष्टांना सप्रेम नमस्कार..!!
सर्वदूर आपल्या सामाजिक व विकास कार्याने नावलौकिक प्राप्त झालेली ग्रामसंसद पांगरखेड , पं.स. मेहकर, जि. बुलढाणा यांच्या वतीने आपणा सर्वांचे या संकेतस्थळावर हार्दिक स्वागत...!!
तुम्हा सर्वांशी सर्वार्थाने आणि सर्वांगाने जोडले गेलेले हे संकेतस्थळ म्हणजे, आपली ही ग्रामसंसद राबवीत असलेल्या सामाजिक व विकासात्मक उपक्रमांचे आणि इतर मौलिक कार्याच्या संपर्काचे केंद्रस्थान आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका ग्रामसंसदीची अल्पावधीत घेतलेली गगन भरारी व यशोगाथा थोडक्यात मांडत आहोत...!!
बुलढाणा जिल्ह्यात वसलेल्या मेहकर तालुक्यातील पांगरखेड गावाने ग्रामविकासात उत्तुंग झेप घेतली आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाद्वारे गावात ग्रामोन्नतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि काही अवधीतच गावाचे संपूर्ण स्वरूपच पालटले. आदर्शगाव पांगरखेडला महाराष्ट्र शासन "स्मार्ट ग्राम योजने" अंतर्गत जिल्हा, तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम" स्पर्धेचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रथम पारितोषिक पुरस्कार मिळाले आहेत.
स्वच्छ ग्राम अभियानांतर्गत नव्या पिढीला तसेच इतर गावांना प्रेरणा मिळावी तसेच सामाजिक व विकासात्मक विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी हे एकविसाव्या शतकाला साजेसे असे हायटेक व्यासपीठ "ग्रामसंसदपांगरखेड.कॉम"(www.gramsansadpangarkhed.com) या मराठी भाषेतील संकेतस्थळाच्याद्वारे आपणापर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. आपण सर्वांनी नियमित या संकेत स्थळाला भेट देवून तसेच आपल्या विचारांच्या साथीने आपलं गाव व ग्रामसंसद पुढे नेण्याच्या आमच्या उद्दिष्टात आपण आपले भरघोस साहाय्य कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.धन्यवाद..!!
Read more