ग्रामसंसद गावाची यशोगाथा व माहिती

"विकासाचे नवे पर्व आदर्श गाव पांगरखेड"

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका ग्राम पंचायतीची अल्पावधीत घेतलेली गगनभरारी..!!

बुलडाणा जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत पांगरखेड विदर्भाची पंढरी शेगाव, मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावे विकासाच्या दिशेने वाटचाल करित आहे. यापैकी मेहकर तालुक्यातील अशी एक ग्रामपंचायत विकासाच्या ध्येयाने वाटचाल करत गावाचा कायापालट कसा होऊ शकतो याचा आदर्श इतर ग्रामपंचायतीसमोर ठेवला. गावक-यांमध्ये प्रत्येकाच्या मना-मनात स्वच्छतेला जे पवित्र स्थान होते जी महत्वाकांक्षा होती तिला योग्य दिशा दाखविण्याचे काम केले ते गावचे सरपंच श्री.सुधाकर मधुकर धंदरे यांनी आणि त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिली त्या उपसरंपच सौ.सिंधुताई नंदकिशोर सुर्वे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्ह्याच्या यशात असाच एक मानाचा तुरा रोवला आहे. मेहकर तालुक्यातील एक आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारुपास आलेली पांगरखेड ग्रामपंचायत, पांगरखेड गावाने गावविकासात उत्तुंग झेप घेतली आहे. पांगरखेड गावाने आजपर्यंत अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे. त्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राज्यस्तरावरील विशेष पुरस्कार, अमरावती विभागातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक; तालुका ,जिल्हा-जिल्हा स्मार्ट ग्राम, ई-ग्रामपंचायत जिल्हास्तर प्रथम पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश आहे. मेहकर तालुक्यातील पांगरखेड हे १८५२ लोकसंख्या असलेले गाव. गावाच्या भौगोलिक स्थितीचा विचार करता गावाचे एकुण क्षेत्र ५२२ हेक्टर असून २४८ हेक्टर हे कोरडवाहून क्षेत्र आहे, २७४ हेक्टर क्षेत्र हे बागायती आहे. ग्रामपंचायतच्या पाठपुराव्यातून आनंद अटल घन वन योजना राबवत २४ हजार ५३ प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली. गावात लोकसहभागातून महादेवाची मूर्ती व भारत मातेची मूर्ती ह्या बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे व लाऊडस्पीकर बसविण्यात आले.



गावाने एकत्र येऊन पुढाकार घेतला गावात प्रत्येक घरी शौचालयाची सुविधा झाली. आज रोजी गावात एकुण ४५२ कुटुंबे असून आज रोजी प्रत्येकाकडे शौचालयाची सुविधा असून गावात कुणीही उघड्यावर शौचास जात नाही. गावातील व गावाबाहेरुन येणारे, गावात होणा-या सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने कुणीही शौचासाठी उघड्यावर बाहेर जाणार नाही या उद्देशाने गावात २ सार्वजनिक स्वच्छता गृहांची सुध्दा निर्मिती करण्यात आली. केवळ उघड्यावरील हागणदारी बंद केल्याने गाव स्वच्छ होणार नाही याची जाणीव ग्रामस्थांना होतीच. गावात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, १५ वा वित्त आयोग आदी निधीमधून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्याचे. सरपंच श्री. सुधाकर मधुकर धंदरे यांनी सदस्यांच्या सहकार्यातून सर्वप्रथम गावातील घरा-घरातील कचरा संकलन करणेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीची स्वतःची घंटागाडी घेतली व वयक्तिक दोन ओला-सुका कचरा कुंडी वाटप करण्यात आली. तसेच गावक-यांना प्रबोधनातून प्रत्येक कुटुंबात ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रवृत्त केले. प्रत्येक कुटुंबांत नियमितपणे ओला व सुका कच-याचे वर्गीकरण करण्यात येऊ लागले व ग्रामपंचायतीच्या घंटागाडीद्वारे प्रत्येक कुटुंबाचा कचरा संकलन करण्यात येऊ लागला. गावात १०० टक्के कुटुबांकडे ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी २ स्वतंत्र कचरा कुंडी आहेत. एवढ्यावरच न थांबता गावात ५ कंपोस्ट पिट, १ नॅडेप कचरा कंपोस्ट शेड,प्लास्टीक संकलन केंद्र , कचरा विलगीकरण केंद्र असे कचरा वर्गीकरण शेड उभारण्यात आले आहे.



गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी जेव्हा तसेच गावातच गांडुळ खत शेड सुध्दा उभारण्यात आले आहे गावातील कुटुंबस्तरावरील व सार्वजनिक स्तरावरील कच-याचे योग्य व्यवस्थापन केल्यावर पुढचे उद्दीष्ट होते ते गावातील उघड्यावरील सांडपाण्याचे. गावातील कुटुंबस्तरावरील सांडपाणी हे उघड्यावर सोडले जात होते. गावात भुमिगत गटारांची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक कुटुंबाचे सांडपाणी हे भुमिगत गटारीद्वारे गावाबाहेरील एका स्थिरीकरण तळ्यात सोडले जाते. हे पाणी शेती कामासाठी वापरले जाते. सांडपाण्याचे योग्य असे नियोजन केल्याने गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेही सांडपाणी साचलेले दिसत नाही. गावात असलेली १ ते ७ वर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुध्दा डीजीटल शाळा म्हणून नावारूपास आलेली आहे. शाळेच्या परिसरातच मुलांसाठी व मुलीसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहांची सुविधा असून ते नियमित स्वच्छ ठेवले जातात तसेच मुलेही त्याचा वापर अगदी आवडीने करतात. गावात सुसज्ज अशा बोलक्या स्वरुपाचे ३ अंगणवाडी केंद्र असून तेथे सुध्दा स्वच्छता गृहांची सुविधा आहे. अंगणवाडीमध्येच आरसा, नेलकटर, मुलांच्या आवडीची खेळणी असल्याने लहान लहान मुले ही अगदी आवडीने अंगणवाडी केंद्रात नियमितपणे येतात. आज पांगरखेड ग्रामपंचायतीत १००% वैयक्तीक शौचालयाचा वापर, सार्वजनिक स्वच्छता गृहांचा वापर, उच्च दर्जाचे असे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता अशा एक ना अनेक वैशिष्ट्यांमुळे स्वच्छ सुंदर अशा या गावाने केवळ ओडीएफ ग्रामपंचायतपर्यंतच प्रवास पूर्ण केला असे नसून आज ही ग्रामपंचायत ओडीएफ प्लस सुध्दा घोषीत करण्यात आली असून शासनाच्या संकेतस्थळावर सुध्दा तशी नोंद करण्यात आली आहे.